सातारा : तानाजी किसन फडतरे व इतर यांच्या दारकोंडीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नुकतेच निवेदन दिले आहे. सदर निवेदनाद्वारे खटावच्या तहसीलदार बाई माने यांचे निलंबन करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी केली आहे. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, खटाव तहसिलदार (वडूज) यांचे वर्तन सर्वसामान्य जनतेशी लोकसेवकाऐवजी ठेकेदार पध्दतीचे असल्याने सदर तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही या अकार्यक्षम तहसिलदारामुळे त्रस्त झालेली आहे. सदर कार्यालयात पैसा कमवणे हा एकमेव उद्दिष्ट ठेऊन लोकसेवक या पदाला कलंकित करण्याचे काम सदर तहसिलदार करत आहे. त्यांच्या अकार्यक्षम, मनमानी आणि आडमुठेपणा तसेच भ्रष्टाचारी वृत्तीने वडूज तहसिल कार्यालयात गेल्या ४ ते ५ महिन्यात अॅन्टी करप्शन ब्युरोच्या तीन वेळा धाडी पडलेल्या आहेत. यामध्ये दोन वेळा पैशांची देवाण-घेवाण करताना कारवाई झाली असून तिसऱ्या कारवाईत प्रत्यक्ष तहसिलदारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याने एसीबीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून यांचेवर आपल्या कार्यालयाकडून कारवाई करण्याचे आदेश पारित झालेले असल्याचे विश्वसनीय माहिती उपलब्ध झालेली आहे. भ्रष्टाचारालाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या संमस्यांना लागलेली कीड म्हणजे वडूज तहसिलदार आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास गुरुवार, दि. १९ सप्टेंबर २०२४ पासून आपल्या कार्यालयाबाहेर संदर्भीय विषयात संबंधित पिडीत कुटुंब गुराढोरांसह तसेच अबालवृध्दांसह बेमुदत आंदोलन करणार असून त्यास आमचा सशर्त पाठींबा व सक्रिय सहभाग नोंदवणार आहोत. याची गंभीर दखल घेऊन खटाव तहसिलदार (वडूज) यांचेवर तात्काळ कारवाई करणेत यावी. सदर निवेदनावर संजय गाडे (तात्या), चंद्रकांतदादा कांबळे, विशालभाऊ कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.