सातारा जिल्हा

जिल्हा बँक भरतीच्या आमिषाने तरुणांचे शोषण करु नका; कॉग्रेसचे नेते विराज शिंदे यांचा इशारा

Blog Image

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध २९६ पदांसाठी निघालेल्या भरतीचे आमिष दाखवून सत्ताधारी गट सर्वसामान्य घरांतील तरुणांचे आर्थिक, मानसिक व सामाजिक शोषण करण्याचा प्रयत्न करत असून भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विराज शिंदे यांनी केली आहे. बँकेच्या भरती प्रक्रियेत अशा पध्दतीची घटना आढळल्यास वाई , खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील तरुण त्यांना माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्हा बँकेत विविध पदांसाठी भरती जाहिरातीचा उल्लेख करुन विराज शिंदे म्हणाले, या भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक होणार हे निश्चित आहे. कारण विद्यमान आमदार आणि त्यांचे तीन-चार समर्थक, नातेवाईक जिल्हा बँकेत संचालक म्हणून कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर असताना ही भरती जाहिरात आली हा निश्चितच योगायोग नाही. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील अनेक युवकांना नोकरीचे गाजर दाखवण्यात आले आहे. त्यांच्याकडून आगामी निवडणुकीत पडेल ती कामे करुन घेतली जातील. त्यांची विद्यमानांच्या बगलबच्चे कंपनीकडून आर्थिक, मानसिक, सामाजिक व शारीरिक पिळवणूक केली जाईल. या भरतीप्रक्रियेत वशिलेबाजी खपवून घेणार नाही. पात्र उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. भरतीप्रक्रिया अतिशय पारदर्शक पध्दतीने राबवण्यात यावी. योग्य उमेदवारांची फसवणूक, लुबाडणूक होऊ नये. या प्रक्रियेत थोडा जरी गोंधळ गडबड आढळला तर युवकांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल, हे लक्षात असू द्या, असेही विराज शिंदे म्हणाले.