सातारा जिल्हा

अचूक मतदार याद्यांच्या आधारे खुल्या वातावरणात निवडणूक व्हावी, हीच इच्छा; कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांवरुन विरोधकांकडून जाणीवपूर्वक राजकारण : ना. महेश शिंदे यांचा आरोप

आमचे आक्षेप चुकीचे असतील, जरुर तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; विरोधकांना दिले थेट आव्हान
Blog Image

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्याप्रमाणावर मतदार यादीमध्ये चुकीच्या पध्दतीने नावे वाढविण्यात आलेली आहेत, मतदार यादीतील दुबार नावांच्या आधारे एकदा नव्हे तर दोनदा मतदान करत आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वारंवार दिसून आले आहे. भारतीय लोकशाहीतील महत्वाची घटक असलेली मतदार यादी ही सदोष असावी, या हेतूने ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे विवाह होऊन गेलेल्या मुलींची माहेरात नावे आहेत, अशी मतदारयादीत जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेली आहेत. निवडणूक आयोगाने राबविलेल्या शासकीय प्रक्रियेमध्येच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीतील अधिकारानुसारच मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे, राजकारणाचा हा काही भाग नाही, विरोधकांना जर हा आक्षेप चुकीचा असेल तर जरुर तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत चुकीचे काम होऊ देणार नाही. मतदार यादी ही अचूक व योग्य असावी, अशीच भूमिका कायम आहे. विरोधकांनी जाणीवपूर्वक या विषयाचे राजकारण चालवले आहे, असा आरोप कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी केला. कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी मतदार यादीवरुन सुरु केलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. विरोधकांनी जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला असून, त्यातून संभ्रमाचे वातावरण निर्माण करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ना. शिंदे यांनी केला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिनभैय्या बर्गे, रशीद शेख, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक सागर वीरकर, प्रीतम शहा, संतोष बर्गे, शिवसेनेचे कोरेगाव शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, कोरेगावच्या जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीदभाई मुल्ला, अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष फिरोजभाई बागवान, नूरअल्ली पटवेकर, फरदीन मुजावर, नौशाद शेख, आयुब शेख यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. ना. महेश शिंदे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सातत्याने मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रम सातत्याने राबविला जातो. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आणि निरीक्षणाखाली ही सर्व प्रक्रिया सतत सुरु असते. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे ही प्रक्रिया सुरु असते, त्याला कोणी राजकीय रंग देण्याची गरज नाही. प्रत्येक नागरिकाने आपले नाव मतदार यादीत आहे का, याची पडताळणी करण्याची गरज आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर बोगस मतदारांची नावे असल्याचे निदर्शनास आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये हे वारंवार दिसून आले होते, बोगस मतदारांच्या आधारे निवडणूक केली जात होती, त्यामुळे प्रत्येक बुथनिहाय मतदार यादीची पडताळणी केल्यावर त्यामध्ये अनेक जणांची नावे मतदार यादीत दोन-दोन ठिकाणी असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात अनेक जण आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करत असताना, त्यांची नावे कोरेगाव शहरातील मतदार यादीमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख संजय काटकर यांनी नियमानुसार आणि संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकाराप्रमाणे तक्रारी अर्ज केला आहे, हा अर्ज केला म्हणजे मतदार यादीतून नावे वगळली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, तो पूर्णत: चुकीचा आहे. निवडणूक विभागामार्फत तक्रारीची पडताळणी होते, अगदी बी. एल. ओ. पासून ते विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी त्याची शहनिशा करतात, त्यासाठी चौकशीकामी नोटीस बजावली जाते, जर तुमचे नाव योग्य आहे, तुम्ही दाखविलेल्या पत्त्यावर वास्तव्य करत असाल, तर तुमचे नाव कोण काढू शकणार आहे, म्हणजे ज्यांची नावे मतदार यादीत योग्य आहेत, ती कायम राहतील, जी नावे बोगस आहेत, दुबार आहेत, शहरात आणि ग्रामीण भागात अथवा पुणे-मुंबईसह देशातील अन्य महानगरांमध्ये आहे, ज्यांची आधारकार्ड ज्या पत्यावरील आहेत, तेथे ती नावे राहतील, कोरेगाव मतदारसंघातील ती नसतील, तर ती वगळली जातील, एवढी सरळ आणि स्पष्ट बाब आहे, केवळ आपल्या बगलबच्चांची नावे वगळली जाऊ नयेत, मोठ्याप्रमाणावर मतदार यादीत ऑनलाईन पध्दतीने नावे घुसवली आहेत, ती रद्द होऊ नयेत, निवडणुकीत आपल्याला त्याचा फायदा व्हावा, या राजकीय हेतूने विरोधक खोटे-नाटे आरोप करत असल्याचे ना. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधकांच्या म्हणण्याप्रामणे जर आम्ही चुकीच्या पध्दतीने खोट्यानाट्या तक्रारी करत आहोत, असे वाटत असेल तर त्यांनी खुशालपणे आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आव्हान ना. शिंदे यांनी दिले. कोरेगाव शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पध्दतीने नावे घुसविण्यात आलेली आहेत. वास्तव्य एका प्रभागात, मतदान दुसर्‍या प्रभागात, काही ठिकाणी तर दोन-दोन ठिकाणी मतदार यादीत नावे, हे भारतीय लोकशाहीसाठी योग्य आहे का? कोणताही आकस ठेवून अथवा राजकीय हेतूने तक्रारी अर्ज करुन नावे वगळण्याचा प्रयत्न नाही, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा नियमाप्रमाणे काम करत आहे, ज्यांची नावे कमी होत आहेत, असे वाटत असेल तर त्याला आम्ही वकिलामार्फत सेवा पुरवू, वकिलांची फौज त्यांच्यासाठी उभी करु, मात्र खरा मतदार असलेल्या एकाही व्यक्तीचे चुकीच्या पध्दतीने नाव कमी करु देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव शहरात मुस्लिम समाजाचे १९ टक्के मतदान आहे. त्यांच्या मतदारांची संख्या देखील जास्त आहे. मतदार यादीवर हरकत घेत असताना जात-पात असा भेद करण्यात आलेला नाही. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची नावे वगळली जात असल्याचा आरोप चुकीचा आहे, त्यामध्ये विरोधक चुकीचे राजकारण करत आहेत. कोरेगाव शहरात सुमारे १२०० नावांवर रितसर हरकत घेण्यात आलेली आहे, त्यापैकी मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या केवळ १२० आहे, जर त्यात चुकीचे झाले असेल असे वाटत असेल तर चौकशीच्या प्रक्रियेला सामोरे जावे, प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्या सुनावणीच्या नोटीसा घेऊन सुनावणीस हजर रहावे आणि पुरावे सादर करावेत, जर चुकीचे काही नसेल तर प्रशासकीय अधिकारी नावे कमी करणार नाहीत, जर चुकीचे वाटत असेल, पुरावे नसतील, तर निश्‍चितपणे नावे कमी होतील, असेही ना. शिंदे यांनी सांगितले. 

मतदारयादीत विरोधकांकडून मोठा घोळ; ना. महेश शिंदे यांचा आरोप

मतदार यादीतील नावांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांवरुन विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे. त्यांनी आजवर ज्या मतदारांच्या जीवावर निवडणुका केल्या, ती नावे आज बेकायदेशीर ठरत असल्याने मतदार यादीतून वगळली जाणार आहेत, याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी केवळ राजकारण आणि राजकारण म्हणून याविषयी चुकीची माहिती प्रसारित करुन सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करुन ना. महेश शिंदे यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महेश शिंदे नामक उमेदवाराची हकीकत सर्वांना सांगितली. तो रहिवासी कुठला, वास्तव्य कोठे करत होता, त्याचे करारनामे कोठे केले गेले आणि कोणत्या गावच्या मतदार यादीत त्याचे नाव घातले गेले, याची सर्व माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर कोडोली परिसरातील शर्मा कुटुंबातील २३ सदस्य असलेल्या मतदारांची माहिती त्यांनी दिली. लखनौ येथील रहिवासी असलेल्या या मतदारांबाबत त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करुन विरोधकांवर मतदार यादीतील नावांबाबतच आरोप केला. विरोधकांकडून आजवर मतदार यादीत मोठा घोळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.