कोरेगाव : कोरेगाव शहरासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण अमृत दोन अंतर्गत २४ बाय ७ पाणी योजना मंजूर झाली असून, त्यासाठी तब्बल ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी आपल्या मालकीची कृष्णा नदीकाठी असलेली जागा मोफत देऊ केली आहे. या जागेवर या योजनेचे नवीन पंप हाऊस व जॅकवेल उभारले जाणार आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता कोरेगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जागा विक्रीच्या दस्तावर ना. महेश शिंदे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. १९९५ साली मंजूर झालेल्या व प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या कठापूर येथील पाणीपुरवठा योजनेवरून सध्या शहराच्या बहुतांश भागाला पाणीपुरवठा केला जातो. कोरेगाव शहराचा वाढता विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अमृत केंद्र सरकारच्या अमृत दोन मधून कोरेगाव शहरासाठी नवीन २४ बाय ७ पाणी योजना मंजूर करण्यात आलेली आहे. त्यासाठी ६७ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. ही योजना गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या बंधाऱ्यालगत काही अंतरावर केली जाणार आहे. कृष्णा आणि वसना नदीच्या संगमावर कृष्णा नदीकाठी ना. महेश शिंदे यांच्या स्वमलकीची जमीन असून ही जमीन आता नवीन पाणी योजनेच्या पंप हाऊस व जॅकवेलसाठी देण्यात आली आहे. या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याद्वारे कोरेगाव शहराला २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्यात सातत्याने पाणी उपलब्ध राहणार असल्याने कोरेगावला कधीही पाणी कमी पडणार नाही. ना. महेश शिंदे यांनी गुरुवारी दुय्यम निबंधक कार्यालयात कोरेगाव नगरपंचायतीच्या नावे ही जागा विना मोबदला खरेदी खत करून दिलेली आहे. नगरपंचायतीच्यावतीने मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिनभैय्या बर्गे, रशीद शेख, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, प्रीतम शहा, संतोष बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्व रहिवासी हे माझ्या कुटुंबातील सदस्य असून त्यांना पुढच्या चाळीस वर्षे पाणी समस्येला सामोरे जाऊ लागू नये, त्यांना अहोरात्र पाणी मिळावे यासाठी ही शिंदे कुटुंबियांची जागा आज विना मोबदला नगरपंचायतीला दिली आहे. कोरेगाव शहराच्या ऋणातून उत्तराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्यकाळात कोरेगाव शहरासाठी लागेल ते योगदान देणार असल्याचे ना. महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.