सातारा जिल्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संरक्षीत स्मारकाचा प्रश्न मार्गी लागणार

आमणे कुटुंबाची घेतली रमेश उबाळे यांनी भेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवून प्रश्न त्यांच्याकडे मांडणार
Blog Image

सातारा : जिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची सुरुवात केली. त्या साताऱ्यातल्या सदरबाजारात असलेल्या सिटी सर्व्हे नंबर 1 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संरक्षीत स्मारक व्हावे अशी आंबेडकर अनुयायांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. शासनाने त्यावर निधी मंजूर केला होता. मात्र, ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने परिस्थिती जैसे थे होती. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी त्या ठिकाणी भेट दिली. आमणे कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. आमणे यांनी निवासस्थानाची झालेली दुरावस्था दाखवली. उबाळे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्रभाई कवाडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.  

साताऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही अनुयायांनी आमणे बंगला येथेच डॉ. बाबासाहेब रहात होते, असा त्या काळात दावा केला होता. त्यानुसार शासनाकडे त्या काळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संरक्षीत स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. त्यास 2007 च्या दरम्यान प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला होता. 2013 मध्ये मंजूरी देवून सदरबाजारातल्या सिटी सर्व्हे नंबर 1 मधील 2929 चौरस मीटर क्षेत्रामध्ये हे स्मारक होण्यासाठी तत्कालिन सरकारने जागेसाठी सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांची किमत अपेक्षित धरुन मंजूरीही दिली होती. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्या कामास स्थगिती मिळाली होती. आज त्या जागेत उदय आमणे हे रहात आहेत. ऐतिहासिक ठसा लागल्याने त्या इमारतीची डागडुजी सुद्धा आमणे यांना करता येत नाही. त्यामुळे या इमारतीचे छत गळत आहे. भिंती सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत. पाठीमागून कण्हेर कालवा जात असल्याने त्यातून साप, विंचू असे घरात येवून मुक्काम करत असतात. त्या ठिकाणास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी भेट दिली. त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यांना उदय आमणे यांनी इमारतीची माहिती दिली. त्यावरुन रमेश उबाळे यांनी त्यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी जोगेंद्रभाई कवाडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून तडीस नेला जाईल. साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संरक्षित स्मारक होण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.