कोरेगाव : राज्य सरकारने सर्वसामान्य माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, त्यासाठी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत समाविष्ठ होण्यासाठी बँक खात्याची आवश्यकता असून, सर्वसामान्य महिलांना बँक खाते उघडून देण्यासाठी कोरेगाव येथे ना. महेशदादा शिंदे साहेब विचारमंच आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ६ व रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयामध्ये मोफत बँक खाते उघडून दिले जाणार आहे. कोरेगाव शहर व परिसरातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, त्यांना बँक खाते काढता यावे यासाठी कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने महिला खातेदारांसाठी मोफत बँक खाते काढून दिले जाणार आहे. महिलांनी येताना आधारकार्ड, पॅनकार्ड (असल्यास उत्तम नसल्यास चालेल) व फोटो घेऊन यावेत, असे आवाहन ना. महेशदादा शिंदे साहेब विचारमंच आणि नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. कोरेगाव मतदारसंघातील सर्व माताो-भगिनींना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, जास्तीत जास्त माता भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपले खाते उघडून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माता-भगिनींची विशेष काळजी घेणार, योजनेचा लाभ मिळवून देणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पूर्णपणे आणि पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे, त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले असून सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविल्या जाणार आहेत, अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करून घेतली जाणार असून या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ना. महेश शिंदे यांनी दिली आहे.