सातारा : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २३/६/२०२४ रोजी दुपारी १ वाजता मोरया लॉन्स मंगल कार्यालय दत्तनगर,तेजस पेट्रोल पंपा शेजारी, सातारा रहिमतपूर रोड, कोडोली (सातारा) येथे संपन्न होणार आहे. तरी या सभेस सभासदांनी अगत्यपूर्व उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव व्हाइस चेअरमन शहाजी खाडे यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले आहे. सेवा,समृद्धी व सहकारासाठी सदैव तत्पर असणारी प्राथमिक शिक्षक बँक ही जिल्ह्यातील बँकांमध्ये अग्रगण्य असणारी बँक आहे. या बँकेच्या विश्वसनीयतेवर विश्वास ठेवून समाजातील अनेक लोकांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बँकेकडे ७०० कोटी रुपयांच्या ठेवी आज रोजी आहेत. तसेच ५०० कोटींचे कर्जवाटप बँकेने केलेले आहे. सन २०२४ हे बँकेचे शताब्दी महोत्सवी वर्ष असून नजीकच्या कालावधीमध्ये भव्यदिव्य शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचेही चेअरमन यांनी सांगितले. कार्यक्रमात बँकेचा आज पर्यंत नावलौकिक वाढवणाऱ्या संचालक मंडळ व सभासदांचा सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. बँकेस ३१ मार्च २०२४ अखेरीस ७ कोटी ४२ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून संचालक मंडळाने ६.५०% लाभांश देण्याची शिफारस केली आहे. बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी संचालक मंडळ कटिबध्द असल्याने बँकेला प्रगतीपथावर नेणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व सभासद बंधू भगिनी यांनी या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन, व्हाइस चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री छगन खाडे यांनी केले आहे.