सातारा जिल्हा

खटाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची अनेक प्रकरणे तहसीलदार यांची सही नसल्याने प्रलंबित

मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा
Blog Image

वडूज : गेल्या चार महिन्यापासून खटाव तहसील कार्यालयात दाखल असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेची अनेक प्रकरणे तहसीलदार यांची सही नसल्या कारणाने प्रलंबित आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अनेक वेळा संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी टोलवा टोलवीची उत्तरे देत आहेत. संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर खटाव तहसीलदार यांनी सह्या केल्या नसल्याने अनेक सर्वसामान्य लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. किमान महिला तहसीलदार असताना त्यांना विधवा महिला, अपंग महिला, निराधार महिला, घटस्फोटीत महिलांची तळमळ पाहिजे होती. मात्र प्रत्यक्षात या सर्व योजनेची कामे सही नसल्याने प्रलंबित आहेत. तहसीलदार मॅडम संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर सह्या कराल का? असा सवाल मनसेचे राज्य चिटणीस सूरज लोहार यांनी पत्रकारांसमोर केला. आज वडूज येथील मनसे कार्यलयात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी विशाल गोडसे, सचिन खुडे, पवन नागावकर, मन्सूर खोत, आदित्य लोहार, मंगेश लोहार, विशाल लोहार, तुषार लोहार, अमित पंडित, ऋषिकेश लोहार, महेश देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री लोहार पुढे म्हणाले, खटाव तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ जास्त आहे. मात्र याठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून लोकांना टोलवाटोलवी केली जातं असल्याचा आरोप ही त्यांनी केला. याबाबत लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेची संजय गांधी निराधार योजनेत असणारी प्रकरणे मार्गी लावावीत अन्यथा मनसे च्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा यावेळी दिला आहे.