बामणोली : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेने आटल्याने या संपूर्ण परिसरातील जुनी मंदिरे व घरांचे अवशेष आता पूर्ण क्षमतेने दिसू लागले आहेत.
कोयना धरण निर्मितीपूर्वी कोयना भागातील १०५ गावांची बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कसबे बामणोली या गावची बाजारपेठ पाणी आटल्यामुळे उघड्यावर आली आहे. गावाच्या मध्यभागी असलेले श्री भैरवनाथाचे मंदिर व त्या सभोवताली त्याच गावांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या बारा बलुतेदार समाजातील घटकांची घरे, त्यांचे चौथरे आता दिसावयास सुरुवात झाली आहे. वामणोली बाजारपेठेसह आजूबाजूला असणाऱ्या पागवाडी, बामणवाडी या वाड्यांसह इतरही वाड्यांचे अवशेष दिसावयास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे बामणोली येथून तालुक्याच्या ठिकाणी मेढ्याला जाणारा जुन्या काळातील दगडी पूल देखील दिसू लागला आहे. ज्या ज्या वेळी कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेने घटते त्यावेळी हे अवशेष जमिनीबाहेर दिसू लागतात. आत्ताही हे अवशेष उघडे पडले आहेत. आपले जुने गाव, मंदिर पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. बामणोली गावासह कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय
पातळीमध्ये जी जी गावे बुडीत क्षेत्रात गेलीत व त्यांचे पुनर्वसन झाले त्या बुडीत क्षेत्रातील गावांचे अवशेष दिसायला सुरुवात झाल्याने त्या त्या गावातील पुनर्वसित झालेली लोक मैलोन मैलाची पायपिट करत त्या अवशेषांपर्यंत पोहोचत आहेत. तेथील मंदिरात देवदर्शन घेऊन परत सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी जात आहेत. संपूर्ण कोयना भाग १०५ गावांमध्ये ज्या त्या ठिकाणी मंदिरांतील मूर्ती व घरांचे अवशेष पहावयास मिळत आहे.