सातारा जिल्हा

अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याबाबत पाचगणी नगरपालिकेने दिल्या नोटिसा

Blog Image

पाचगणी : पाचगणी नगरपालिका हद्दीतील अनाधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज, फ्लेक्स काढण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका पुढील आठवड्यात एकत्रितपणे राबवणार असल्याची माहिती प्रशासक निखिल जाधव यांनी दिली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या अनुषंगाने पाचगणी नगरपालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढून घेण्यासाठी मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. खासगी व सार्वजनिक जागांमधील होर्डिंग्ज, बॅनर/फ्लेक्स मालकांनी १५ दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावेत, अन्यथा नगरपरिषदेमार्फत कारवाई करून ते काढण्यात येतील व त्याचा होणारा खर्चही संबंधितांकडून वसुल करण्यात येईल. आपणावर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे या नोटीसीव्दारे बजावले आहे. पाचगणी बसस्थानकामधील होर्डिंगबाबत महाबळेश्वर आगार प्रमुखांनाही नोटीस दिली असून बसस्थानक हद्दीतील सर्व होर्डिंग व फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट १५ दिवसांत पूर्ण करावे. तशाच सूचना सार्वजनिक बांधकाम विभागालाही दिल्या असून महाबळेश्वर - पाचगणी राज्यमार्गावर असलेले अनाधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्सवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. वाई महाबळेश्वर पोलादपूर राज्यमार्गावरील पाचगणी न. पा. हद्दीतील रस्त्यालगत अंदाजित १६ होर्डिंग्ज/लोखंडी बोर्ड आहेत. त्याचे अधिकार आपणाकडे असून ते सत्वर काढून घ्यावेत, असे संबंधित बांधकाम विभागाला बजावले आहे.