सातारा : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवल्या प्रकरणी मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत करण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी ९ जूनपर्यंत कारवाई करावी अन्यथा १० जूनपासून माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे. या निवेदनावर झाडाणी परिसरातील खातेदार आणि त्यांच्या ५० वारसदारांच्या सह्या आहेत.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झाडाणी येथील ग्रामस्थ खोपोली (जि.रायगड) येथे १९८० सालापासून स्थलांतरीत आहेत. १९६० साली कोयना धरणासाठी कोयना, कांदाटी या भागातील गावांचे पुनर्वसन झाले. त्यावेळी या भागातील गावाचे पुनर्वसन झाले. त्यावेळी आमच्या झाडाणी गावालाही नोटीस बजावली होती. आमचे गाव शेवटच्या टोकाला आहे. डोंगरावर असल्याकारणाने तेथे दळणवळण करणे शक्य नव्हते. दरम्यान पुनर्वसन झाल्यावर आम्हाला शासनाचा कोणताही मोबदला मिळाला नाही. आमचे गाव हे अतिदुर्गम भागात असल्याकारणाने तेथे दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. अति पाऊस आणि हिंस्र श्वापदांच्या त्रासामुळे, भितीमुळे नाईलाजास्तव घरदार व जमीन, जुमला सर्व काही सोडून मुलाबाळांसह पोट भरण्यासाठी रायगड या ठिकाणी घरापुरती जमीन घेऊन मोल मजुरी करून जीवन जगत आहोत. आम्ही त्या ठिकाणी आमची जमीन, आमची जागा सोडून आल्याची माहिती मिळताच स्थानिक जमीन दलालांनी नवीन वस्तीचा पत्ता शोधून ग्रामस्थांना जमीन विकता का? असे विचारल्यानंतर ग्रामस्थांनी जमीन विकण्यास नकार दिला. त्यानंतर एजटांनी जर तुम्ही जमीन विकली नाही तर ती जमीन शासन जमा होईल. त्यापेक्षा ती जमीन विकून त्या जमिनीचा मोबदला घ्या, अशी भीतीं ग्रामस्थांच्या मनात निर्माण केली. त्या भितीपोटी गावातील काही ग्रामस्थ जमीन विकण्यासाठी तयार झाले. त्यांनी त्या एजंटसमोर आमच्या नावावर काही जमीन शिल्लक राहिली पाहिजे, शिल्लक राहिलेल्या
जागेमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ता असावा, आमचे गावठाण आमचे नावे असावे अशा अटी ठेवल्या. परंतु आमचे ग्रामस्थ अशिक्षित असल्याकारणाने ग्रामस्थांची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आली ही जमीन चंद्रकांत वळवी, जिल्हा नंदुरबार आणि त्यांचे नातेवाईक यांच्या नावे करण्यात आली. ज्या ग्रामस्थांचा विरोध होता त्या ग्रामस्थांना वकिलामार्फत खोटया नोटीसी पाठवून जमीन विकण्यास भाग पाडले. श्री. चंद्रकांत वळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले परंतु आम्हाला त्यांनी जुमानले नाही. या जमिनीमध्ये हनुमान मंदिर तसेच ग्रामदैवत श्री लव्हेश्वर मंदिर सर्व्हे नंबर १२ मध्ये आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता चंद्रकांत वळवी यांनी ठरल्याप्रमाणे ठेवला नाही. मंदिर हे पुरातन असल्यामुळे आमचे वंशपरंपरेने त्याची पुजाअर्चा होणे तसेच माहेरवासिनेचे नारळ किंवा ओटी भरणे तसेच नित्य देवपुजा यासाठी रायगड जिल्हयामधून ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये वर्षातुन एक ते दोन वेळा येत असतो. मात्र संबंधित चंद्रकांत वळवी, त्यांचे परिवार धाकधपटशाही आणि दांडगाईने संबंधित जागेमध्ये आणि मंदिरामध्ये प्रवेश करू देत नाहीत, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सर्व्हे नंबर १२ लगत श्री लव्हेश्वर ईनामी जमीन १७० एकर आणि वहिवाटी नावे सामूहिक जमीन आहे. तरी ग्रामस्थांना या क्षेत्रात जाण्या-येण्याकरता चंद्रकांत वळवी व नातेवाईक यांच्या जागेतून रस्ता होता परंतु आम्हा ग्रामस्थांना फसवून या वहिवाटी रस्त्यावर पाबंदी घालण्यात आली असून त्या क्षेत्रातून जाण्या-येण्यास बंदी घातली आहे.
या ठिकाणी जायचे असल्यास दोडाणी या गावात वाहने उभी करून चार ते पाच किलोमिटर पायी चालत जावे लागते आणि तेही त्यांच्या नोकरदारांना विचारून पायी जाऊ शकतो. श्री. चंद्रकांत वळवी यांना आम्ही अनेकवेळा त्यांच्या भेट घेण्याची विनंती केली परंतु आता पर्यंत त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून त्यांनी आमच्याशी एकदाही संपर्क केला नाही किंवा उत्तरही दिले नाही. या एजंटने ग्रामस्थांची फसवणूक करून पॉवर ऑफ ऑटर्नी नावे करून संपूर्ण जमीन हडपली आहे. सर्व ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. या एजंटने काही जमिनीचा मोबदला न देता पूर्णपणे जमीन मूळ मालकाच्या नावे केली. तरी याविषयी योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले असून गंभीर गुन्हा झाला आहे. त्या एजंटने आमच्याकडून काही डॉक्युमेंट्स वर रायगड येथे येऊन सहया व अंगठे घेतल्या आहेत. पूर्वीच्या काळी ऑनलाईन पध्दतीने दस्त नव्हते त्यामुळे सर्व कागदपत्रे बोगस बनवून दिशाभूल करून जमिनी खरेदी केल्या आहेत. ज्या जमीनींचे खरेदीपत्र झालेले आहे. त्यांचे सर्व कागदपत्र पडताळून एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, त्यामुळे मयत असणाऱ्या व्यक्तींच्या नावे खरेदीपत्र कसे झाले. त्याचबरोबर खरेदीपत्र करणारे दुय्यम निबंधक, एजंट, दस्त लेखनिक तसेच या दस्तऐवजाची नोंद करणारे तत्कालीन तलाठी, सर्कल, तहसालदारांची खातेनिहाय चौकशी करावी आणि वंशपंरपरागत असलेली जमीन आम्हाला परत मिळावी, तसेच पुरातन श्री लव्हेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी व पुजा अर्चा करण्यासाठी रस्ता तातडीने मिळावा. गावठाणातील आमची जागा सातबाराप्रमाणे आम्हांला परत मिळावी. आम्हाला तेथे शेती आणि राहण्यासाठी तसेच उपजीविका करण्यासाठी परवानगी मिळावी, ही कारवाई दि. ९ जूनपर्यंत प्रशासनाने करावी अन्यथा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.१० जून पासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून चौकशीअंती आढळणाऱ्या दोषी घटकांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले