देश-विदेश

निर्मला शाळेवर कठोर चौकशीचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक ॲक्शन

तीन उच्च अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत
Blog Image

सातारा : विद्यार्थ्यांच्या तुकड्या पाडताना यादीमध्ये अक्षम्य चूक करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेन्ट स्कुलला त्यांची चूक चांगलीच भोवली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी कडक दखल घेतली असून सोमवारी चौकशी करून कठोर कारवाईचे लेखी आदेश जिल्हा परिषद सिईओ याशनी नागराजन यांना दिले आहेत. 

दरम्यान, निर्मला स्कूलची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने अतिरिक्त सीईओ महादेव घुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर अशा तीन उच्च अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केली आहे.

राज्यात आणि देशात जातीय व धार्मिक वातावरण गढूळ झाले असताना निर्मला स्कूलने केलेली चूक अक्षम्य मानली जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षकरता स्कूलने इयत्तांच्या तुकड्या पडल्या असून त्यात विद्यार्थ्यांच्या जात - धर्माचा उल्लेख केला आहे. आणि या याद्या विद्यार्थी व पालकांना पाठवल्या आहेत. वास्तविक, तुकडी करताना जातीचा किंवा धर्माचा काय संबंध? 

निर्मला स्कूल ही ख्रिस्चन मिशनरीकडून चालवली जाणारी शाळा आहे. स्कूलने या याद्या करताना हिंदू धर्मातील विशेषतः ओबीसी समाजातील जातींपुढे "हिंदू" धर्म लावणे टाळले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. रविवारी याचा आगडोंब उसळला असता मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेवून अद्याप आचारसंहिता लागू असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने आंदोलन टळले. आणि आंदोलकांनी शाळेच्या गेटला निषेध पत्र डकवले. 

भाजपासह विविध संघटनांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

या प्रकरणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली. या शिष्टमंडळापुढेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सीईओ याशनी नागराजन यांना चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे याशनी नागराजन यांनी अतिरिक्त सीईओ महादेव घुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या तीन उच्च अधिकाऱ्यांची चौकशी समिती सोमवारीच गठित करून तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे.