सातारा जिल्हा

लाईट गेल्यास महावितरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करु

माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा महावितरण कार्यालयास इशारा
Blog Image

सातारा : सध्या प्रचंड उकाडा आहे. 40 अंशाच्या दरम्यान तापमान आहे. त्यातच अध्येमध्ये वळीवाचा पाऊस वादळीवाऱ्यास पडत आहे. शहर व परिसरात विद्युत पुरवठा त्वरीत बंद पडतो आहे किंवा जाणीवपूर्वक बंद केला जात आहे. अचानक विद्युत पुरवठा बंद केल्याच्या प्रकारामुळे घरातील विद्युत उपकरणे जळत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. दिवसा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. हे थांबले नाही तर महावितरण कार्यालयाच्यासमोर सर्व जनतेच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीला दिलेला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपण सध्या आपल्या स्वखुशीने लाईट बंद करता व चालू करता ते योग्य नाही. सध्या उन्हाळा हा अतिशय तीव्र व कडक स्वरुपाचा आहे. सध्याचे तापमान हे सतत 40 अंशाच्या दरम्यान आहे. त्यातच अधून मधून कधी थोड्या प्रमाणात तर कधी मोठया प्रमाणात वादळासह वळीवाचा पाऊस पडत आहे. सध्या थोडा जरी पाऊस पडला तरी सातारा शहर व परिसरातील विद्युत पुरवठा त्वरीत बंद पडतो आहे किंवा जाणीवपूर्वक बंद केला जात आहे. विद्युत पुरवठा बंद पडल्यानंतर आपल्या कार्यालयास फोन केल्यानंतर आपल्याकडे त्याची ठराविक कारणे तयार असतात. सध्या वळीवाच्या पावसामुळे जर विद्युत पुरवठा खंडीत होत असेल तर जूनमध्ये पावसाळा सुरु झाला तर आपण पुर्ण पावसाळा हंगामामध्ये वीज पुरवठा बंद ठेवणार आहात काय, महावितरण कंपनीने जरा सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. तसेच सर्वसामान्य जनतेला बिल भरण्यास थोडा वेळ झाला तरी आपण त्वरीत त्याची मागील हिस्ट्री न पहाता विद्युत पुरवठा कट करता. 31 मार्चला आपण सर्व बिले वसुल करुन घेता. जशी आपण वसुलीची मोहिम राबवता तशी लाईन न जाईल याचीही मोहिम राबवा. आम्हा सातारकरांना नाहक त्रासापासून वाचवा. कारण रात्र रात्र वीज नसेल तर नागरिकांची काय अवस्था होत असेल याचा आपण सहानभूतीपूर्वक विचार करावा. तसेच अचानक लाईट गेल्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रीक उपकरणे जळतात व त्याचाही त्रास आपल्यामुळे नागरिकांना सहन करावा लागतो. सध्या दिवसा वीज बंद होण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जर येथून पुढे अशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला आपल्या कार्यालयाच्यासमोर जनतेच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, कायदा व सुवस्था बिघडल्यास त्यास आपली महावितरण कंपनी पुर्णपणे जबाबदार राहिल, असा इशारा दिला आहे.