सातारा जिल्हा

भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा

सातारा तालुक्यातील भजनी मंडळांसाठी शेंद्रे अजिंक्यतारा साखर कारखाना येथे तर, जावली तालुक्यातील भजनी मंडळांसाठी मंगलमूर्ती मंगल कार्यालय करंजे ता. जावली येथे हि स्पर्धा होणार आहे
Blog Image

सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा आणि जावली येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा तालुक्यातील भजनी मंडळांसाठी शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना येथे दि. १५ मे रोजी तर, जावली तालुक्यातील भजनी मंडळांसाठी मंगलमूर्ती मंगल कार्यालय करंजे ता. जावली येथे दि. १७ मे रोजी हि स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस दिले जाणार असून स्पर्धेत विनामूल्य सहभाग घेता येणार आहे, अशी माहिती आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. 

     शेंद्रे येथे होणाऱ्या स्पर्धेत फक्त सातारा तालुक्यातील भजनी मंडळाना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक संघात किमान ५ सदस्य असावेत, प्रत्येक संघाला १५ मिनिटे वेळ दिला जाईल, प्रत्येक संघाने २ अभंग व १ गाथ्यातील गौळण सादर करावी. संघ नोंदणी करताना आपली सदस्य संख्या नोंद करावी, सहभागी प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह दिले जाईल, संघ नोंदणी दि. १३ मे २०२४ रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत पर्यंत केली जाईल. स्पर्धेत महिला संघानाही प्रवेश दिला जाईल, एका स्पर्धकाला एकाच संघात सहभाग घेता येईल, सहभागी संघाला प्रत्येकी ५०० रुपये प्रवास भाडे दिले जाईल तसेच स्पर्धकांसाठी अल्पोपहार आणि भोजनाची मोफत सोय केली जाणार आहे. स्पर्धा दि. १५ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सुरु होईल. बक्षीस समारंभ दि. १६ मे २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी होईल. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला २१,१११ रुपये, द्वितीय क्रमांक १५,१११ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११,१११ रुपये तसेच उत्तेजनार्थ ५,००० रुपये प्रत्येकी अशी दोन बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक २५०१ रुपये आणि उत्कृष्ट तबला वादक २५०१ रुपये बक्षीस दिले जाणार आहे. मंडळांच्या नाव नोंदणीसाठी संभाजी शेळके ९९२१४३०७६३, नागनाथ चव्हाण ९०७५७६०९९०, आप्पासो गायकवाड ९५४५५१०४६१,  विजय शेळके ९७६६८६३८७१ यांच्याशी संपर्क साधावा.

     जावली तालुक्यातील स्पर्धेत एका मंडळात किमान ७ सदस्य असावेत, सदस्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, महिला भजनी मंडळांनाही सहभागी घेता येईल, मंडळाने आपली वाद्ये आणावीत, एक व्यक्ती एकाच मंडळात सहभाग घेऊ शकतो, संगीत शिक्षक व व्यावसायिक कलाकारांना सहभागी होता येणार नाही, अशी नियमावली असून जावलीतील स्पर्धा करंजे येथे दि. १७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरु होईल. स्पर्धकांनी आजपासून दि. १७ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. दि. १७ रोजी सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार असून या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला २५,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला १५,००० रुपये, तृतीय क्रमांकाला ११,००० रुपये, चतुर्थ क्रमांकाला ७,००० रुपये तर, पंचम क्रमांकाला ५,००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट वादक २५०० रुपये आणि उत्कृष्ट गायक २५०० रुपये बक्षीस दिले जाणार आहे. मंडळांनी नाव नोंदणीसाठी प्रवीण महाराज शेलार ९३२५७८०८९७, विशाल रेळेकर ९४२१११८००४, दत्ता देशमुख ९४२३२६४३४५, अमरनाथ शिंदे ९६०४८०८९९१ यांच्याशी संपर्क साधावा. 

     स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेला परीक्षक म्हणून संगीत विशारद व तज्ज्ञ व्यक्ती असणार आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी कसल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. तरी, या भजन स्पर्धेत सातारा आणि जावली तालुक्यातील भजनी मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.