सातारा जिल्हा

स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

१६ मे रोजी ८० वी जयंती असून यानिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
Blog Image

सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकारमंत्री स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांची गुरुवार दि. १६ मे रोजी ८० वी जयंती असून यानिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात  येणार आहे. यावेळी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सातारा आणि जावली तालुक्यातील विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाऊसाहेब महाराजप्रेमी उपस्थित राहणार आहेत. शेंद्रे येथील कारखाना हॉल येथे बुधवार दि. १५ रोजी भव्य भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली असून या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी सकाळी १० वा. कारखाना कार्यस्थळावर आ. शिवेंद्रसिंहराजे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. १७ रोजी करंजे ता.मेढा येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दि. १६ रोजी जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर तसेच तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.