सातारा जिल्हा

सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी निवड झालेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांनी केला सुमित सूर्यकांत पवार यांचा सत्कार

Blog Image

कराड : चचेगाव (ता. कराड) येथील सुमित सूर्यकांत पवार यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०२३ परिक्षेत सहाय्यक कार्यकारी अभियंता (श्रेणी १) पदी निवड झाली. या निवडीबद्दल सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांनी सुमित सूर्यकांत पवार यांचा आज सत्कार केला. सुमित सूर्यकांत पवार हे कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता सूर्यकांत आत्माराम पवार यांचे चिरंजीव आहेत. तसेच कराड पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी (कै.) आत्माराम पवार (बापू) व आण्णाजी पवार विद्यालय, वहागावचे निवृत्त मुख्याध्यापक तसेच नडशीचे सरपंच श्री. गोविंदराव कृष्णा थोरात यांचे ते नातू आहेत. सुमित हे अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचे आहेत. त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण कराड येथील (कै.) का. ना. पालकर या शाळेत झाले असून, नंतरचे सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, खावली (सातारा) येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे झाले. तर बी. ई. सिव्हील या पदवीचे शिक्षण ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (एआयएसएसएमएस) येथून त्यांनी पूर्ण केले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेसाठी त्यांचे शिक्षणाबरोबर प्रयत्न सुरू होते. जिद्द, चिकाटी व सातत्य ठेवल्याने त्यांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवले. संपूर्ण महाराष्ट्रात २७ वा क्रमांक प्राप्त करत त्यांनी हे यश संपादन केले. सद्या ते राज्य सरळसेवा भरतीतून पाटण येथील नगरपंचायतीत नगर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वडील कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागामधील शाखा अभियंता सूर्यकांत आत्माराम पवार व आई सौ. मानका पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच अभिषेक धामणकर (सर), विजय शिंगाडे (सर), वैभव शेलार (सर) यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. सुमित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात २७ वा क्रमांक प्राप्त करत सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी निवडीबद्दल बांधकाम विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.