मेढा : जावली तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ISO 9001: 2015 मानांकन प्राप्त झालेले आहे अशी माहिती जावली तालुका, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी दिली. ते पुढे म्हणाले, मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाच्या कार्यवाही मध्ये सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा इत्यादी या बाबींचा समावेश करण्यात आलेला होता. त्या अनुसरून तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली यांनी मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानांकनसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करून मानांकन प्राप्त केले आहे
तालुका कृषी अधिकारी, जावली कार्यालय सन 1998 मध्ये बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे कार्यालयात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती होत होती, तसेच 1998 पासून कार्यालयीन अभिलेखाचे वर्गीकरण करण्यात आलेले नव्हते, तसेच कागदपत्राचे निंदणीकरण सुद्धा करण्यात आलेली नव्हते. त्यासाठी कार्यालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एकजुटीने कार्यालयातील सर्व अभिलेखाचे वर्गीकरण केलेले असून, त्यासाठी वेगळी अभिलेख कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. शासकीय कार्यालय म्हटले की स्वच्छता नसणे, स्वच्छता ग्रहाची सोयी नसणे, कोणतीही कागदे भिंतीवर चिटकवणे परंतु जावली कृषी कार्यालय शेतकऱ्यांना चांगली सेवा देता यावी, यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्यसूचीनुसार कामाचे वाटप करून सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकरी प्रतिक्षालय तयार केलेले आहे. चांगल्या पिण्याच्या पाण्याची सुविधा कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. स्वच्छ व सुंदर अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांचे शंका / समाधान व्हावे व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुंदर असे खेळाचे मैदान सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. तरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली यांच्या 100 दिवसांमध्ये आमुलाग्र बदल घडलेला असून कार्यालयाकडून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होत आहे
100 दिवसाच्या कार्यालय कार्यक्रम राबवताना वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, सुशोभीकरण, तत्काळ तक्रार निवारण, अभिलेख वर्गीकरण, शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा या कार्यालयाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या असून, ISO मानांकन प्राप्त करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतलेली असून, मांनाकनामुळे अजून जबाबदारी वाढलेली आहे. भविष्यात या कार्यालयाकडून चांगल्या सोयीसुविधा व सेवा तात्काळ उपलब्ध होतील. - प्रकाश राठोड (तालुका कृषी अधिकारी, जावली)