सध्या राज्यात सरकार आहे तरी कुठे ? सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांना आपआपली पक्ष संघटना बळकट करायची आहे. पक्ष वाढवायचा आहे. पक्षवाढीकडे ते लक्ष देत आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, दुष्काळाची दाहकता, पाणीटंचाई हे विषय पाहण्यास सरकारला वेळ नाही. सरकारकडे पैसा नाही, त्यामुळे उपाययोजना करायसाठी तरतूद नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी रविवारी दुपारी दीड वाजता आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या सरकारचे अस्तित्व राहिले नाही. शंभर दिवस कृती कार्यक्रम जाहीर केला, त्यासाठी अधिकाऱ्यांना पळवले, मात्र कृती कार्यक्रम राबवण्यासाठी किंवा त्यातून नवनवीन योजना राबवण्यासाठी सरकारकडे पैसा आहे तरी कुठे? निव्वळ सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची भालवण करायची आणि आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुष्काळाची दाहकता वाढली आहे. अनेक गावे आणि वाड्या वस्त्या पाण्याने तहानलेल्या आहेत. पाण्याचे टँकर शासनाने सुरू करावे यासाठी प्रस्ताव सादर करून अनेक दिवस उलटून गेले तरी देखील टँकर सुरू केले जात नाहीत. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना अधिकार प्रदान केले गेले नाहीत. एकूणच सरकारचे सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप देखील आमदार शिंदे यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी जागोजागी जनता दरबार घेत आहेत. वास्तविक पाहता आमसभा ही तालुक्याची चित्र स्पष्ट करणारी असते. आमसभा कोठे होताना दिसत नाही. जनता दरबारातून जनतेचे प्रश्न सुटत असले तर आनंद आहे, मात्र सरकार आपले आहे, मुख्यमंत्री आपण आहोत, मंत्री आपले आहेत असे दाखवून अधिकाऱ्यांना आपल्या मागे पळवण्यासाठी सध्या स्पर्धा आहे. त्यामुळे अधिकारी सामान्य जनतेसाठी उपलब्ध होत नाहीत हे भीषण वास्तव आहे, असेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस हेच २०३४ सालापर्यंत मुख्यमंत्री राहणार आहेत, त्यांचे वक्तव्य स्पष्ट आहे. त्यातून भाजपला महाराष्ट्रासारख्या सधन राज्याचे नेतृत्व सोडायचे नाही, असे दिसून येत आहे. मित्र पक्षांचा केवळ वापर केला जात आहे. भविष्यकाळात मित्र पक्षांना भाजपमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. भाजपला महाराष्ट्राची सत्ता हवी आहे, म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची युती तोडली होती, याची आठवण देखील आमदार शिंदे यांनी करून दिली.
काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत याविषयी सर्व पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठाम राहणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारत पाकिस्तानला करारा जवाब देईल, असा विश्वास देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.