सातारा जिल्हा

माहुलीचा पूल : 110 वर्षांची धोकादायक वाटचाल! प्रशासनाने दुर्घटनेची वाट पाहू नये - राजेंद्र चोरगे

Blog Image

सातारा : मावळ येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल मुदत संपल्याने कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील संगम माहुली येथील 110 वर्षांपूर्वीच्या पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रिटिशकालीन पुलाची 100 वर्षांची मुदत संपून 10 वर्षे उलटली असतानाही नवीन पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल श्री बालाजी ट्रस्ट, सातारा येथील राजेंद्र चोरगे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. "प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहुली येथील कृष्णा नदीवरील पुलाला 110 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलाचे बांधकाम करणाऱ्या ब्रिटिशकालीन कंपनीने महाराष्ट्र सरकारला या पुलाची 100 वर्षांची मुदत संपल्याचे लेखी कळवले होते, असे समजते. याचा अर्थ, तांत्रिकदृष्ट्या हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या गंभीर धोक्याची जाणीव असूनही, नवीन पुलाच्या बांधकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही.

श्री. चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले की, सातारा-कोरेगाव रस्त्यावर नवीन पूल बांधण्यासाठी तीन-चार वर्षांपूर्वीच निविदा काढण्यात आली होती आणि काम सुरू झाले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, तीन वर्षांत केवळ एकच पिलर उभारला गेला आहे. या गतीने काम सुरू राहिल्यास नवीन पूल पूर्ण होण्यासाठी अजून पाच ते दहा वर्षे लागू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मावळ येथील दुर्घटनेचा दाखला देत चोरगे यांनी म्हटले आहे की, दुर्लक्षामुळे आणि कामाच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. माहुलीचा पूल कोसळल्यास सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाचा पूर्ण संपर्क तुटून मोठी मानवी हानी आणि आर्थिक नुकसान होईल. त्यानंतर केवळ चौकशा होतील आणि गुन्हे दाखल होतील, पण गेलेले जीव परत येणार नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

या परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन, राजेंद्र चोरगे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, त्यांनी प्राधान्याने माहुली येथील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घ्यावी. भविष्यातील अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.