सातारा जिल्हा

अन्न व औषध प्रशासन विभागातील वाहन बंद अवस्थेत

शासकीय वाहना अभावी भेसळ खोरांवर त्वरित कारवाया करण्यास होत आहे अडथळा
Blog Image

सातारा : सातारा येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील वाहन गेली अनेक महिने बंद अवस्थेत असल्याचे पहायला मिळत आहे. या विभागातील शासकीय वाहनच बंद अवस्थेत असल्याने त्वरित करण्यात येणाऱ्या कारवायांना अडसर ठरत आहे. भेसळ खोरांना अटकाव घालून जनतेच्या आरोग्य विषयक काळजी घेणाऱ्या या साताऱ्यातील विभागाची काळजीच आता सरकारने घेणे गरजेचे ठरले आहे. या विभागातील अधिकाऱ्यांना काम करत असताना जनतेच्या विविध तक्रारी येत असतात. सातारा जिल्ह्यातील अकरा तालुके या विभागाच्या अंतर्गत येतात. या विभागाचे कार्यालय सातारा येथे आहे. सातारा जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून जनतेच्या विविध तक्रारी या विभागास प्राप्त होतात. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी या विभागातील अधिकारी यांना शासकीय वाहनच उपलब्ध नसल्याने मिळेल त्या वाहनाने जावे लागते. रात्री-अपरात्री तक्रार आल्यानंतर वाहनाअभावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे भेसळखोरांवर अंकुश ठेवता येत नाही. 

    अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ही ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी प्रमुख संस्था असून महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली येते. ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधे, सौंदर्य प्रसाधने व सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्यासाठी त्यासंबंधी असलेल्या अधिनियमांची अंमलबजावणी या प्रशासनामार्फत करण्यात येते. औषध व अन्न पदार्थामधील भेसळीस प्रतिबंध करणे हे अन्न व औषध प्रशासनाचे महत्वपूर्ण कार्य आहे. संबंधित अधिनियम/नियम यांची अंमलबजावणी करणे ही या यंत्रणेची जबाबदारी आहे. अन्न व औषध प्रशासनाची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालये असून सहाय्यक आयुक्त या दर्जांचा अधिकारी हा जिल्हा कार्यालयांचे नियंत्रण करीत असतो. 

    सातारा येथील या विभागातील वाहन लवकर सुरू करावे अशी मागणी सातारा जिल्ह्यातील जनतेच्या वतीने होत आहे. सातारचे नूतन जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष्य घालावे असे बोलले जात आहे.