ऐतिहासिक सातारा नगरी म्हणजे मराठ्यांची राजधानी! छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू (थोरले) महाराज यांचा जनसेवेचा समर्थ वारसा चालवणाऱ्या छत्रपतींच्या राजघराण्यात जन्मलेल्या श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या कुशल, अभ्यासू आणि धाडसी वृत्तीने तहहयात जनसेवा करून छत्रपती घराण्याचा नावलौकिक वाढवला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा जोमाने पुढे नेणाऱ्या स्व.अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्यामुळेच सातारा तालुका हा सातारा जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर ठळकपणे उमटला! 'विना सहकार नही उद्धार' या ब्रिदवाक्याचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या स्व. भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून कायम ओळखले जाते. समाजकारणातील त्यांचे अनमोल कार्य दीपस्तंभाप्रमाणे सर्वांनाच कायम प्रेरणा देत राहील! त्यांचा आज २१ वा पुण्यस्मरण दिन, यानिमित्त त्यांना वाहिलेली शब्द सुमनांजली!
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्यदैवत. याच छत्रपतींच्या घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा जन्म १६ मे १९४४ रोजी झाला. राजघराण्यात जन्म झाला असला तरी, इतर माणसांप्रमाणेच आपण एक माणूस आहोत या भावनेतून संपूर्ण जीवन जगताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट उपसले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे जीवन जगत स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही तर त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो मोठा होतो, हे स्व. भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने दाखवून दिले. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या रूपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जावू लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी संपूर्ण राज्यभरात सहकार क्रांती घडवली. सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील गोर- गरीब, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्त करतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला.
तालुक्याचा चौफेर विकास
राजकारणात सक्रिय झालेल्या भाऊसाहेब महाराजांनी राजकारणाला कमी महत्त्व देत समाजकारणासाठी वाहून घेतले. सातारा तालुक्यात सहकार क्रांतीबरोबरच जलक्रांती घडवून सातारा तालुक्याला सुजलाम सुफलाम केले. उरमोडी धरणाची निर्मिती करून सातारा तालुक्यासह दुष्काळी माण- खटाव तालुक्याची तहान भागवली. सातारा तालुक्यात ठिकठिकाणी पाणीसाठवण बंधारे बांधले. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सभामंडप, सुसज्ज ग्रामपंचायत इमारती उभ्या करून प्रत्येक गावाला विकासप्रवाहात आणले. सातारा तालुक्याचा चौफेर विकास साधून जिल्ह्यात सातारा तालुक्याला नेहमीच अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळेच सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आजही स्व.भाऊसाहेब महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मी राजा नाही, जनतेचा सेवक आहे, हीच भूमिका घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांसाठी खर्ची घातले. अखंडपणे जनतेची सेवा केली आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरात आपला हक्काचा माणूस म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचा आजही आदराने उल्लेख केला जातो. निगर्वी, शांत, संयमी, नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा जनसामान्यांचा राजा म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते आणि चंद्र, सूर्य असेल तोवर कायम घेतले जाईल यात तिळमात्र शंका नाही.
सहकारातून उघडले समृद्धीचे कवाड
राजकारणात असताना विविध जबाबदारीची पदे सक्षमपणे सांभाळून त्या पदाच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील जनतेचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्व. भाऊसाहेब महाराज यांनी जीवनभर केला. तत्कालीन सहकार मंत्री असलेल्या भाऊसाहेब महाराजांनी संपूर्ण राज्यात सहकार क्रांती घडवून आणली. प्रत्येक गावात विकास सेवा सोसायट्यांचे जाळे विणले आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आर्थिक सक्षम करण्याचे अनमोल काम भाऊसाहेब महाराजांनी केले. 'विना सहकार नही उद्धार' हे ओळखूनच भाऊसाहेब महाराजांनी शेंद्रे ता. सातारा येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुकाच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्काची संस्था उभी करून दिली. आज याच साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह आपसपासच्या तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला उच्चतम दर मिळत आहे. याच कारखान्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. याच कारखान्यामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला आहे आणि याच कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह परजिल्ह्यातीलच नव्हे, तर परराज्यातील सुद्धा असंख्य घरातील चुली दररोज पेटतात, ही वस्तुस्थिती आहे. भाऊसाहेब महाराजांनी विविध सहकारी संस्थांना शासकीय पाठबळ दिले आणि त्यामाध्यमातून तळागळती लोकांना, शेतकरी आणि काबाडकष्ट करणाऱ्या लोकांना समृद्धीची कवाडे खुली करून दिली.
विविध सहकारी संस्थांची उभारणी!
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानंतर स्व. भाऊसाहेब महाराजांनी वळसे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची उभारणी केली. आज त्यांचे सुपुत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीतून उच्चतम दर्जाचे सूत उत्पादित केले जाते आणि हे सूत देशी व परदेशी बाजारपेठेतही निर्यात केले जात आहे. सूत गिरणीच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज, वीज वितरण कंपनीला वितरित केली जाते. यामुळेच सातारा शहर आणि तालुक्यातील भारनियमन आटोक्यात आले आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समूहात विविध सहकारी संस्थांची उभारणी झाली आणि सहकारातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योग समूहाचा नावलौकिक झाला. अजिंक्य उद्योग समूहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
कोणत्याही पदाचा उपयोग लोकांसाठी झाला तरच त्या पदाचा नावलौकिक वाढतो. याची जाण आणि भान असेल्या मोजक्या राजकारण्यांमध्ये स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग लोकांसाठी आणि समाजाच्या सामूहिक विकासासाठी कसा करून घ्यावा, लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी कसं करून घ्यावं आणि सामाजिक सलोखा कसा टिकवावा, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे भाऊसाहेब महाराजांचा जीवनपट! विकासवाटेवरचा हा प्रदीर्घ प्रवास आणखीही बरीच वर्षं सुरू राहील, असं वाटत असतानाच ४ फेब्रुवारी २००४ चा काळा दिवस उजाडला. सातारा शहर आणि तालुक्याच्या जनतेला हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व, राजघराण्यात जन्म घेऊनसुद्धा सातत्यानं सामान्यांच्यात रमणारं व्यक्तिमत्त्व, सगळ्यांचे लाडके भाऊसाहेब महाराज यांना त्या दिवशी नियतीनं आपल्यातून हिरावून नेलं. घराघरात सुखासमाधानाचा, समृद्धीचा दीप प्रज्वलित करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे भाऊसाहेब महाराज आज आपल्यात नाहीत, हे पटतसुद्धा नाही. कारण पावलापावलावर त्यांच्या पाऊलखुणा आहेत. साताऱ्याच्या कणाकणात आणि सातारकरांच्या मनामनात भाऊसाहेब महाराज आजही आहेत. त्यांनी चेतवलेला विकासयज्ञ त्यांचे पुत्र नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोमानं पुढं सुरू ठेवला आहे. सर्वसामान्य माणसाला बारा हत्तींचं बळ देणारे भाऊसाहेब महाराज अनेक रूपांनी आजही आपल्यात आहेत. यापुढंही कायम राहतील! सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी भाऊसाहेब महाराज आपल्याला कायम समाजसेवेची प्रेरणा देत राहतील. त्यांच्या आदर्श विचारांच्या वाटेवरून समाजहितासाठी आपण अखंडपणे चालत राहू. राजकारणात राहूनही राजकारण न करणारा, जातपात, गटतट न मानणारा, उच्चनीच असा भेदभाव न करता प्रत्येकासाठी झिजणाऱ्या सर्वसामान्यांच्या या राजाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
- श्री. अमरसिंह मोकाशी (७३५००१०३०३) जनसंपर्क अधिकारी, सुरुची, सातारा.