सातारा जिल्हा

रिपब्लिकन पक्षातर्फे कोरेगावमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न!

Blog Image

कोरेगाव : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि परिवर्तन विचारमंच कोरेगाव तालुक्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव नं. १, २, लक्ष्मी नगर, आणि सुभाष नगर येथे पार पडला. विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” शिक्षण घेतल्यास कोणत्याही अडचणीत घाबरण्याची गरज उरत नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस वनिता खवळे, तालुका युवक अध्यक्ष ऋतुराज वायदंडे, तालुका कार्याध्यक्ष दीपक खरात, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शौकत कुरेशी, कार्याध्यक्ष मनीषा खरात, कविता वाघमारे, सनी खरात, शिरीष आवळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मनीषाताई सोनवणे यांनी सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.