सातारा : जावली तालुक्यातील कसबे बामणोली येथील गावठाण विस्तारातील भूखंड संबंधित खातेदारांना वाटप करण्याचा प्रश्न तब्बल ३७ वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सुटला असून संबंधीत खातेदारांना गावठाण विस्तारातील भूखंडांचे वाटप करण्यात आले. याबद्दल कसबे बामणोली येथील खातेदार, ग्रामस्थांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.
१९८८ सालापासून भूखंड वाटपाचे कामकाज विविध अडचणी, न्यायिक बाबी, हयामुळे प्रतिक्षेत होते, उपविभागीय अधिकारी, सातारा यांचेकडील १९८८ सालचे आदेशानुसार ४८ लाभार्थीकडून कब्जे हक्काची रक्कम भरुन घेण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांकडून तक्रार प्राप्त झाल्याने याकामी १९८९ साली सुधारीत आदेश पारीत करण्यात आले, याबाबत मूळ मालक यांनी सातारा दिवाणी न्यायालयात रे. मु.नं. १६८/८९ दावा दाखल केल्याने वाटप कामकाज प्रलंबित होते, तसेच त्यांचे वारस यांनी न्यायालयात तडजोड केल्याने वाटप कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांनतर ग्रामस्थ बामणोली यांनी फेर तक्रार अर्ज देऊन कसबे बामणोली येथील स.नं. ९६ पैकी २ हे ८० आर क्षेत्रामध्ये पाडलेले भूखंड हे समान क्षेत्राचे नसल्यामुळे एकसारखे भूखंड पाडून फेर वाटप करणेबाबत विनंती केली होती.
सहायक संचालक नगररचना सातारा कार्यालयाकडून शिफारस घेवून एकूण ७२ भूखंड पाडण्यात आले. कब्जे हक्काची रक्कम ५३ खातेदारांनी सर्व ३ हप्ते विहीत मुदतीत शासनास भरणा केले होते तर, १० जणांनी १ हप्ता भरणा केली असून याबाबत तक्रारी प्राप्त झालेने त्यांचे वाटप प्रक्रिया रदद करण्यात आली होती, उर्वरीत ४ भूखंड रिक्त होते. मागासवर्गीय ५ खातेदारांना शासन तरतूदीप्रमाणे मोफत भूखंड वाटप करणे आवश्यक होते. याबाबत शासनाकडून क्र. बैठक - ३५२२/ प्र.क्र. २५ /ज -५ अ दिनांक ११/१०/२०२४ नुसार मार्गदर्शन प्राप्त झाले व कब्जेहक्क रक्कमेचे सर्व हप्ते भरणाऱ्या ५३ खातेदारांना व मागासवर्गीय प्रवर्गातील ५ खातेदारांना मोफत असे एकूण ५८ खातेदारांना उपविभागीय अधिकारी, सातारा यांचेकडील आदेश क्र. गावठाण / भूखंड वाटप /कावि/१२/२५/७६४५२५/२०२५ दि. ०४/०१/२०२५ भूखंड वाटपाबाबतचा आदेश पारित करण्यात आला.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार कसबे बामणोली येथील विस्तारीत गावठाण गट नं ९६/२ प्लॉट नं १ ते ७२ पैकी ५३ + ५ असे एकूण ५८ भूखंड वाटपाबाबत ग्रामस्थांच्या ३७ वर्ष प्रलंबित प्रश्नाचा प्रशासनाकडून निपटारा करण्यात आला असून विस्तारीत गावठाणातील भूखंडांचे आदेश आज प्रशासनाच्यावतीने ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते खातेदारांना वाटप करण्यात आले. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी सातारा विक्रांत चव्हाण, उपविभागीय अधिकारी सातारा सुधाकर भोसले, तहसिलदार सातारा नागेश गायकवाड, तहसिलदार जावली हणमंत कोळेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सांचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह सरपंच कसबे बामणोली व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांचा गेली ३७ वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रशासनाचे आभार मानले.