कोरेगाव : आचार्य बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर यांच्या ध्येयवादी पत्रकारितेपासून सुरु झालेला मराठी पत्रकारितेचा प्रवास आज डीजिटल पत्रकारीतेपर्यंत येऊन पोचला आहे. मात्र आजच्या पत्रकारितेसमोर खूप नवी आव्हाने उभी थकली आहेत. प्रचंड गतिमानता, तंत्रज्ञान आणि मानव रहित माध्यमांचा मारा यामुळे बातमीमागील मानवता आणि समाजसापेक्षता कमी होत आहे. त्यात निर्भीड व नि:पक्ष पत्रकारांचे बळी धनदांडगे व हुकुमशाही प्रवृतीचे लोक घेत आहे. अशा वेळी लोकशाही, सामाजिक बांधिलकी आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या पत्रकारावर येऊन पडली आहे. या निमित्ताने सर्वांनी बाळशास्त्री यांचा वसा पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले महाविद्यालयात मराठी विभाग आणि ‘एक्स-डीपी’एन्स असोसिएशन तर्फे आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत मराठी पत्रकार दिन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोरेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे हे होते. या प्रसंगी विश्वकर्मा युट्यूब चॅनल कोरेगाव संदीप दीक्षित यांनी पत्रकारीतेच्या इतिहासाचा आढावा घेतला. आजच्या पत्रकारितेतील भाषा व तिच्या वापरासंबंधी चिंता व्यक्त केली. आणि नवी माध्यमे ओळखून पत्रकारानी काळाची पावले ओळखावी असे आवाहन केले. या समारंभाला कोरेगाव शहरातील विविध दैनिकांचे पत्रकार पांडुरंग बर्गे, सुरेश बोतालजी, राजेंद्र तरडेकर, विक्रम जगदाळे, नवनाथ पवार, अज्जू मुल्ला, संदीप दीक्षित, शेखर रसाळ, देवेंद्र जमादार, अधिकराव बर्गे, दादासाहेब वाकडे, संभाजी भोसले, प्रज्वल लोहार, कृष्णा जाधव हे मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. पत्रकार मुकेशचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रोफेसर तथा उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ. देवानंद सोनटक्के यांनी केले. तर आभार पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सचिन निकम यांनी मानले. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.