कोरेगाव : नुकतेच काही महिन्यांपूर्वी कोरेगावचे तहसील कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत झाले. भव्य, प्रशस्त व देखणी इमारत तालुक्यातील जनतेसाठी खुली झाली. त्यामुळे जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे या तहसील कार्यालयातील अनेक सुविधांचा अभाव दिसत आहे.
सोळशी ते नागझरी असा विस्तार असलेला कोरेगाव तालुका. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक विविध कामांसाठी तहसीलदार कार्यालयात येत असतात. नवीन स्टॅंड, जुना स्टॅंड पासून दोन-चार किलोमीटर चालत काही नागरिकही या तहसीलदार कार्यालयात येतात. परंतु याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. लिफ्ट तर नावालाच आहे असे नागरिक बोलत आहेत. बसण्याची कोणतीही व्यवस्था या तहसील कार्यालयात दिसत नाही.
इमारत प्रशस्त असूनही सुविधांची वानवाच या कार्यालयात दिसत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी या सुविधा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे बोलले जात आहे . तरी या कार्यालयातील या सुविधा केव्हा सुरू होणार? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.