सातारा : राज्यातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची निवड नुकतीच झाली. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील चार मंत्रिमहोदयांनाही पालकमंत्री पदाची काम करण्याची संधी मिळाली आहे. परंतु सातारा या ठिकाणी वास्तव्यास असणारे शिवेंद्रसिंहराजे यांना सातारा सोडून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्याने अनेकांना आश्यर्याचा धक्का बसला आहे. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गेल्या अनेक टर्म सातारा जावली विधानसभा मतदारसंघांचे नेतृत्व करत आहेत. शांत, संयमी व वेळप्रसंगी आक्रमक स्वभाव असणारे बाबाराजे सर्वांना परिचित आहेत. सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपदे महायुती सरकारमध्ये मिळाली आहेत. या सर्व मंत्र्यामध्ये व जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या आमदारांमध्ये समन्वय साधण्याचे कठीण काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीला करावे लागणार आहे. ज्यावेळी सातारचे पालकमंत्रीपद निवड करायची चर्चा सुरु होती त्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंना संधी मिळेल असे अनेकांना वाटत होते. कारण पालकमंत्रीपदी काम करणारा व्यक्ती हा एका मतदारसंघापूरता नसून संपूर्ण जिल्ह्याचे पालकत्व करण्याचे काम करत असतो. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची संधी शिवेंद्रसिंहराजेंना मिळायला हवी होती असे अनेकांकडून बोलले जातं आहे.