सातारा जिल्हा

खटावचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाघमारे आहेत कुठे?

सातत्याने असणाऱ्या अनुपस्थितीमुळे कामे पेंडिंग पडू लागल्याची जनतेत चर्चा
Blog Image

वडूज : शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात नियमितपणे वेळेत हजर रहावे, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाला खटाव पंचायत समितीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाघमारे यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे दिसते. खटाव पंचायत समितीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी शुभम वाघमारे हे आठवड्यातून एकदाच कार्यालयात येत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून विविध कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सातत्याने विविध कारणे सांगून वाघमारे कार्यालयात येण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. बघेल तेव्हा उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याची "खुर्ची रिकामीच" अशी अवस्था या कार्यालयाची आहे. सध्या पंचायत समितीतील राजकीय पदाधिकारी यांच्या अभावामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही असे दिसत आहे. कार्यालयात येणाऱ्या ठेकेदारांना व नागरिकांना वाघमारे यांची वाट पाहत बसावे लागत आहे. असे अनेक नागरिकांकडून बोलून दाखवले जात आहे. त्यामुळे वाघमारे यांच्यावर वरिष्ठ अधिकारी नियंत्रण ठेवणार का? असा सवाल जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.