कोरेगाव : कोरेगाव शहर व परिसरातील बांधकाम व्यवसायासह सर्व व्यवसायातील कामगारांचा मेळावा सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास कामगारांनी उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नामदार महेशदादा शिंदे साहेब विचारमंचच्यावतीने करण्यात आले आहे.
ना. महेश शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बांधकाम कामगार तसेच शेती, किराणा माल, भुसार माल, शेतीविषयक, औषध दुकान, हॉटेल व्यवसाय, फरशी वितरक, पत्रा लोखंड दुकान, यासर्व व्यवसायातील कामगारांचा मार्गदर्शक मेळावा होणार आहे. आजवर कामगारांनी शासनाची योजनांसाठी नोंदणी केली नसेल किंवा नोंदणी केली आहे, पण लाभ मिळाला नाही ते सुद्धा या मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घेऊ शकतात. त्यांनी मेळाव्याला येत असताना स्वतःबरोबर आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड साईज एक फोटो, आपल्या मुलांचे आधार कार्ड, चालू सिम कार्ड असलेला आणि बँकेची आधार लिंक असलेला मोबाईल हँडसेट घेऊन यावा. कागदपत्रे बरोबर घेऊन येत असताना सर्व कागदपत्रे मूळ व ओरिजनल बरोबर घेऊन येण्याचे आहे.
कामगारांच्या मुलासाठी शैक्षणिक कल्याण योजना असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष अडीच हजार रुपये, इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्षे पाच हजार रुपये, दहावीमध्ये किमान ५० टक्के गुण असल्यास दहा हजार रुपये, कॉम्प्युटर एमएससी आयटी कोर्सची संपूर्ण फी परतावा असून इयत्ता अकरावी व बारावीसाठी प्रति वर्ष दहा हजार रुपये, बारावीत किमान ५० टक्के गुण असल्यास दहा हजार रुपये, डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी २० हजार रुपये, पदवी अभ्यासक्रमामध्ये इयत्ता तेरावी ते पंधरावीपर्यंत प्रतिवर्षी वीस हजार रुपये, पदव्युतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रति वर्ष साठ हजार रुपये, वैद्यकीय डिग्री अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये. शैक्षणिक योजनांचा लाभ हा पहिल्या दोन पाल्यांना दिला जात आहे.
कामगारांसाठी पेटीसह बारा वस्तू असणारा वस्तूंचा संच देखील दिला जात असून कामगारांना स्वतःचे विवाहासाठी तीस हजार रुपये, एका मुलीच्या विवाहासाठी ५० हजार रुपये नॉर्मल डिलिव्हरीसाठी १५ हजार रुपये, सिजेरियन डिलिव्हरी साठी १५ हजार रुपये, गंभीर आजारावर उपचार संपूर्ण कुटुंबासाठी एक लाख रुपये, ७५ टक्के कायमचे अपंगत्व असल्यास दोन लाख रुपये, सर्व कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी, घरकुल योजनेसाठी दोन लाख रुपये, गृह कर्ज योजनेसाठी दोन लाख रुपये, अनुदान मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये, मृत्यूनंतर पती अथवा पत्नीस २४ हजार रुपये पाच वर्षांसाठी, त्याचबरोबर नैसर्गिक मृत्यूसाठी दोन लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे. त्यासाठी ५० वर्ष पूर्ण असण्याची अट आहे, अशी माहिती नामदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्यावतीने देण्यात आली.
कोरेगाव शहर व परिसरातील बांधकामसह सर्वच व्यवसायातील कामगारांनी या मेळाव्यास उपस्थित राहून राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.