सातारा जिल्हा

विकास केला तर मतदारांना अमिष का दाखविता? आ. शशिकांत शिंदे यांचा आ. महेश शिंदे यांना सवाल

Blog Image

सातारा : कोरेगाव मतदारसंघात शासकीय यंत्रणांच्या वापर करून हुकुमशाही प्रवृत्ती राबविली जात आहे. कार्यकर्त्यांना दमबाजी करीत गावातील गावपण, ऐक्य सत्तेच्या जोरावर उद्ध्वस्त करण्याचे पाप येथील आमदारांकडून सुरू आहे. पैसा, अहंपणाचा मोठा उत्माद केला जात असून मतदार येथील एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत. त्यामुळेच या मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट असल्याचे सांगून आ. शशिकांत शिंदे यांनी  विकासकामे केली तर जनतेला अमिष का दाखविता असा सवाल  कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना केला. 

      खावली, महागाव, क्षेत्र माहुली, संगममाहुली, सोनगाव सं.निंब येथील मतदारांशी आ. शशिकांत शिंदे यांनी संवाद साधला त्यावेळी झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. 

     आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आजपर्यंत अनेक निवडणूका झाल्या पण त्यावेळी केवळ तात्त्विक मतभेद होते. पण मतभेद कधीच नव्हते. परंतु सद्या या मतदारसंघात पैसा, सत्ता यांचा उन्माद चालू आहे. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे टाकून दडपशाही राबविण्यात येत आहे. जिथे कमीशन मिळेल तिथेच कामे केली जात आहेत. सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून विकासाच्या नावाखाली स्वतःचे पोट भरले जात आहे. पोलीसांवर दबाव आणून त्यांना एजंट केले जात आहे. येथील कपट व हुकुमशाही प्रवृत्तीला जनता कंटाळली असल्यानेच मतदारांनी आता परिवर्तनाचा विडा उचलला आहे. असे सांगून आ. शशिकांत शिंदे म्हणाले, या मतदारसंघात कोट्यवधी  रूपयांच्या विकासकामातून मी गावपण जपले. युवकांची संघटनात्मक फळी उभी केली. त्यामुळेच येथील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पैसा व अहंकाराचा वध करण्यासाठी जनतेमधून उठाव होत आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा निष्ठावंत व स्वाभिमानाची लढाई करण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले. 

    यावेळी गावागावात ग्रामस्थांनी आ. शशिकांत शिंदे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यावेळी साहेबराव जाधव, पोपटराव जाधव तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी माजी उपसभापती साहेबराव जाधव, युवा नेते संतोष भाऊ जाधव, पोपटराव जाधव, माजी सरपंच निलेश जाधव, सरपंच नुतन सावंत, उपसरपंच सत्यवान आढाव, निरंजन जाधव, राहुल वंजारी,  सोनगाव स. निंबच्या सरपंच अश्विनी कदम, उपसरपंच सचिन रसाळ, सोसायटीचे चेअरमन विजय शिंदे, सुरेश कदम, सुनील शिंदे, अंजना शिंदे, नंदकुमार शिंदे, पोपट मिरगे, कल्याण शिंदे तसेच  महागाव, खावली संगममाहुली, येथील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

न्यायमूर्ती रामशास्त्रींचा वारसा जोपासणारे गाव

 न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी प्रत्येक न्यायाचा निवाडा करून सामान्यांना न्याय दिला. दहशत, दडपशाही याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी  चोख न्यायदान केले. तोच वारसा येथील भुमीत असून या निवडणुकीत मतदार विरोधकांचा पैसा, अहंकार, दडपशाही प्रवृत्तीला मतदानातून धडा शिकवतील. असा विश्वास यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी क्षेत्र माहुली  येथील बैठकीत बोलताना व्यक्त केला. ]