सोळशी : कोरेगाव तालुक्यातील सर्वात भव्यदिव्य असे प्रशस्त बांधकाम झालेल्या सोळशी ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सामाजिक सभागृहाचे उदघाटन रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच नूतन खासदार नितीनकाका पाटील यांची राज्यसभेवर निवड झाल्याने नागरी सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहिती सोळशी ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश सोळसकर यांनी दिली. महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. वाई - खंडाळा - महाबळेश्वरचे आमदार मकरंदआबा पाटील, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी ना. अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व बंधू जीवन सोळसकर यांच्या खंबीर साथीने सरपंच आकाश सोळसकर यांनी आपली यशस्वी राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नातूनच सोळशीकरांसाठी भव्यदिव्य अशी ग्रामपंचायत इमारत व विविध विकासकामे संपन्न होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी झटणारे तरुण युवा नेतृत्व व जनतेसाठी तळमळीने कार्य करणारा समाजसेवक असा नावलौकिक अल्पावधीतच सरपंच आकाश सोळसकर यांनी मिळवला आहे. रविवारी संपन्न होत असलेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी सरपंच आकाश सोळसकर यांनी केले आहे.