सातारा जिल्हा

स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली : राजाभाऊ बर्गे

स्वच्छता अभियानांतर्गत कोरेगावच्या नवीन एस.टी. बसस्थानक परिसराची स्वच्छता
Blog Image

कोरेगाव : स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे, ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती दररोज आंघोळ करून आपले शरीर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले शहर आणि परिसर स्वच्छ ठेवले तर सर्वांचेच आरोग्य चांगले आणि व्यवस्थित राहील. कोरेगाव नगरपंचायतीने हाती घेतलेला स्वच्छता अभियान उपक्रम अत्यंत चांगला आहे, तो वर्षभर राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केली. 

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियान सप्ताह राबविण्यात येत आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता नवीन एस. टी. बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, मुन्नाभाई काझी रशीदभाई शेख, ग्रामपंचायतचे माजी सदस्य दिलीपमामा बर्गे, साहेब युवा मंचचे संस्थापक विजय घोरपडे, शिवसेनेचे शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, पोपटराव भिलारे, अजित विलासराव बर्गे, कल्पेश ओसवाल, इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी सुधा मोरे, एसटीचे वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरेगावच्या नवीन एस.टी. बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. हा परिसर स्वच्छ व सुंदर रहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून एस.टी. महामंडळाला लागेल ते सहकार्य केले जात असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे म्हणाले की, प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकालापासून कोरेगावच्या नवीन एस.टी. बसस्थानकासाठी सर्वतोपरी मदत केली आहे. परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम, बसस्थानक स्वच्छता आदी उपक्रमांना त्यांचा हातभार लागला आहे. जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तेव्हा ते मदत करतात. कोरेगावचे स्वच्छ व सुंदर बस स्थानक ही त्यांची देण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी शहरातील स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी स्वतःहून दिवसातून दोन वेळेस आपल्या घर परिसराची स्वच्छता करून या स्वच्छता अभियानास हातभार लावावा, असे आवाहन केले.

ना. महेश शिंदे यांच्या हस्ते झाला होता शुभारंभ

कोरेगाव नगरपंचायत स्वच्छ व सुंदर कोरेगाव शहर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात स्वच्छ अभियानामध्ये देशपातळीवर कोरेगाव नगरपंचायतीचा गौरव झालेला आहे. कोरेगावकरांनी दिलेल्या साथीमुळे आणि पाठबळामुळे हे यश मिळवू शकलो आहे, आता देखील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून महात्मा गांधी जयंती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण सप्ताहभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून प्रत्येक प्रभागात दररोज स्वच्छता केली जात असल्याचे प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.